Pure Honey: मध हा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक पदार्थ मानला जातो. पचनशक्ती सुधारण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत मधाचे अनेक फायदे आहेत. मात्र, सध्याच्या काळात बाजारात मिळणाऱ्या अनेक अन्नपदार्थांप्रमाणेच मधामध्येही भेसळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपण वापरत असलेला मध खरोखर शुद्ध आहे की नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो. सुदैवाने, काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने मधाची शुद्धता ओळखता येते. सर्वप्रथम, पाण्याची चाचणी करून मधाची शुद्धता तपासता येते. एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात मधाचे काही थेंब टाका. जर मध थेट ग्लासच्या तळाशी जाऊन बसेल, तर तो शुद्ध असल्याचे समजते. मात्र, मध पाण्यात मिसळला किंवा वर तरंगला, तर त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. दुसरी चाचणी आयोडीनच्या मदतीने करता येते. यासाठी मधाचे काही थेंब पाण्यात मिसळून त्यात आयोडीनचे काही थेंब टाका. जर या मिश्रणाचा रंग निळा झाला, तर मधामध्ये स्टार्चची भेसळ असल्याचे ओळखावे. रंगात कोणताही बदल न झाल्यास मध शुद्ध असल्याची शक्यता जास्त असते. तिसरा उपाय म्हणजे ब्लॉटिंग पेपरचा वापर. ब्लॉटिंग पेपरवर मधाचे काही थेंब टाका. मध शुद्ध असल्यास ते थेंब तसेच राहतात. मात्र, जर मध ब्लॉटिंग पेपरमध्ये शोषला गेला, तर तो भेसळयुक्त असू शकतो. याशिवाय काडी आणि कापसाच्या सहाय्यानेही मधाची चाचणी करता येते. एका काडीवर थोडासा कापूस गुंडाळून तो मधामध्ये बुडवा आणि नंतर विस्तवावर धरावा. मध शुद्ध असल्यास काडी लगेच पेट घेते. भेसळ असल्यास काडी पेट घेण्यास अडचण येते. या सोप्या घरगुती चाचण्यांच्या मदतीने मधाची शुद्धता प्राथमिक पातळीवर तपासता येते. मात्र, पूर्ण खात्रीसाठी आणि नियमित वापरासाठी विश्वासार्ह ब्रँडचा मध खरेदी करणे आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते.