Hair Care Tips : हिवाळ्याचा ऋतू जसा थंडावा आणि आराम देतो, तसाच तो त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या घेऊनही येतो. थंड व कोरडी हवा, वातावरणातील ओलावा कमी होणं आणि गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय यामुळे केस कोरडे, निस्तेज आणि गुंतागुंतीचे होतात. अनेकांना या काळात केस गळणे, कोंडा आणि टोकांना फाटणे अशा तक्रारींचा सामना करावा लागतो. महागडे हेअर प्रॉडक्ट्स वापरूनही केसांमध्ये अपेक्षित मऊपणा आणि चमक दिसत नाही. मात्र, योग्य हेअर केअर रूटीन आणि काही सोपे घरगुती उपाय केल्यास हिवाळ्यातही केस मऊ, मजबूत आणि रेशमी ठेवता येतात. आठवड्यातून दोनदा तेलाने मसाज करा हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. नारळ तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा आर्गन ऑईल केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे केस मजबूत होतात आणि गळती कमी होते. मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांच्या वाढीसही मदत होते. योग्य शॅम्पूचा वापर करा केस धुताना नेहमी माइल्ड आणि सल्फेट-फ्री शॅम्पू वापरा. जास्त केमिकल्स असलेले शॅम्पू केसांमधील नैसर्गिक ओलावा काढून टाकतात. हिवाळ्यात रोज केस धुणं टाळा आणि फार गरम पाणी वापरू नका, कारण त्यामुळे केस अधिक कोरडे होतात. शॅम्पूनंतर कंडीशनर वापरणं आवश्यक आहे. यामुळे केस मऊ राहतात, फ्रिझ कमी होतो आणि केस सहज मोकळे होतात. घरगुती हेअर पॅकचा वापर करा आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग हेअर मास्क किंवा घरगुती पॅक वापरा. दही, कोरफड, मध किंवा केळी यांचे पॅक केसांना आतून पोषण देतात आणि केस अधिक मऊ व चमकदार बनवतात. आहार आणि पाणीही महत्त्वाचं केस निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. आहारात प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन A, C, E आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स यांचा समावेश करा. योग्य आहार आणि नियमित काळजी घेतल्यास हिवाळ्यातही केस मजबूत आणि सुंदर राहू शकतात. या लेखातील माहिती सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही त्वचा किंवा केसांशी संबंधित समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.