गुवाहाटी : आसाम सीआयडीच्या विशेष तपास पथकाने सिंगापूरमध्ये झालेल्या झुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास जवळजवळ पूर्ण केला आहे. एसआयटी प्रमुख आणि आसामचे विशेष डीजीपी एम.पी. गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणाचे सविस्तर आरोपपत्र तयार आहे आणि पुढील आठवड्यात गुवाहाटी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केले जाईल. हे आरोपपत्र ठोस पुराव्यांवर आधारित आहे. सिंगापूरमधून सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे मिळाले आहेत. इलेक्ट्रॉनिक पुरावे हे आरोपपत्राचा एक महत्त्वाचा भाग असतील. एसआयटीच्या मते, सिंगापूरमधील सर्व प्रमुख साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे आणि त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय-कायदेशीर अहवाल देखील प्राप्त झाले आहेत. आरोपपत्रात तोंडी, इलेक्ट्रॉनिक आणि कागदोपत्री पुराव्यांचा संपूर्ण लेखाजोखा असेल. एसआयटी प्रमुखांनी भर दिला की तपास व्यावसायिक पद्धतीने आणि कायद्याच्या तरतुदींनुसार करण्यात आला. १९ सप्टेंबर रोजी सिंगापूर येथे स्कुबा डायव्हिंग करत असताना आसामच्या या लोकप्रिय गायकाचा संशयास्पद मृत्यु झाला होता. आधी हा मृत्यु म्हणजे आत्महत्त्या असल्याचे दिसले होते. पण तपास उलगडत गेला तेव्हा नवेच धागेदोरे मिळाले.