चायबासा : झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात एका उन्मत्त जंगली हत्तीने सलग दोन दिवसांत वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये तब्बल १३ जणांचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यांमध्ये आणखी चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती चायबासाचे विभागीय वन अधिकारी आदित्य नारायण यांनी बुधवारी दिली. आदित्य नारायण यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून हा हत्ती मानवी वस्त्यांच्या जवळ फिरत असून मंगळवारी रात्री नोआमुंडी व हाटगामरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने धुमाकूळ घातला. या भागात एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह सहा जणांना हत्तीने चिरडून ठार केले. याआधीच्या दिवशी कोल्हान प्रदेशातही याच हत्तीने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह सात जणांचा जीव घेतला होता. हत्तीला पुन्हा जंगलात हाकलून लावण्यासाठी वन विभागाने विशेष पथके तैनात केली असून पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील तज्ञांची मदत घेतली जात आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि गस्त पथकांचाही वापर केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, हत्तींच्या संचारामुळे दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील सहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वन विभागाचे अपयश – भाजप या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी वन विभागावर तीव्र टीका केली. हत्ती-मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात विभाग अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी ग्राम समितीच्या सदस्यांना टॉर्च आणि फटाके देऊन हत्तींच्या कळपांना हाकलून लावले जात होते, मात्र ही व्यवस्था बंद झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच हत्तींच्या हल्ल्यात अनाथ झालेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने उचलावा, अशी मागणी कोडा यांनी केली.