इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शुक्रवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. रालामंडल परिसरातील तेजाजी नगर बायपासवर एका भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन यांचा समावेश आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य काँग्रेस प्रवक्ते आनंद कसलीवाल यांचा मुलगा प्रखर कसलीवाल याचा वाढदिवस साजरा करून हा मित्रपरिवार कारने घरी परतत होता. पहाटे ५:१५ च्या सुमारास त्यांची कार नियंत्रण सुटल्याने एका उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात प्रेरणा बच्चन, प्रखर कसलीवाल आणि मनसिंधू या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चौथी प्रवासी अनुष्का राठी ही गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त कृष्ण लाल चंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात प्रखर हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. अतिवेग आणि मद्यप्राशन यामुळे गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त – या घटनेवर माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. बच्चन कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर मोठा असून, ईश्वर त्यांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो,” अशा भावना नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.