नवी दिल्ली : भारतीय लष्कराने २०२६ हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करी दलाची संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करणे, युद्धाच्या वेळी रिअल-टाइम निर्णय घेणे आणि तांत्रिक बळावर शत्रूला चोख प्रत्युत्तर देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने ही घोषणा केली. भारतीय लष्कर मागिल एका दशकापासुन परिवर्तनाच्या टप्प्यातुन वाटचाल करत आहे. संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नावीन्य हे भारताच्या लष्करी सामर्थ्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत. स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सततच्या सुधारणांमुळे आपण लष्कराला अधिक सक्षम आणि भविष्यवेधी बनवत आहोत, नेटवर्किंग आणि डेटा-केंद्रितता या परिवर्तनाला नवीन गती देत आहेत, असे त्यांनी लष्कराच्या एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या संदेशात नमूद केले. देशाच्या सुरक्षेबाबत भाष्य करताना जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, भारतीय लष्कर पूर्ण दक्षतेने आणि दृढ निश्चयाने सीमांचे रक्षण करत आहे. गेल्या वर्षी शत्रूच्या कुरापतींना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, हे ऑपरेशन आजही यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर २०२५ मध्ये एका चर्चासत्रादरम्यान लष्करप्रमुखांनी मान्य केले होते की, नेटवर्किंग आणि डेटा व्यवस्थापन हे असे क्षेत्र आहे जिथे आपल्याला अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर २०२६-२७ हे वर्ष तंत्रज्ञान आणि डेटावर आधारित युद्धनीतीसाठी समर्पित करण्यात आले आहे. यापूर्वी २०२४-२५ हे वर्ष तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष म्हणून पाळले गेले होते. लष्करप्रमुखांची रुग्णालयाला भेट आपल्या दौऱ्याच्या दरम्यान जनरल द्विवेदी यांनी दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील बेस हॉस्पिटलला भेट दिली. तेथे उपचार घेत असलेल्या सेवारत जवानांशी आणि माजी सैनिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करत लष्करप्रमुखांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचीही त्यांनी प्रशंसा केली.