पाटणा : राजदचे नेते तेजस्वी यादव एकप्रकारे १०० दिवसांचे राजकीय मौन बाळगणार आहेत. संबंधित कालावधीत बिहारमधील नव्या एनडीए सरकारच्या कामकाजाविषयी काही न बोलण्याचे त्यांनी ठरवले आहे. युरोप दौऱ्यावरून पाटण्यात परतलेल्या तेजस्वी यांना पत्रकारांनी गाठले. त्यावेळी त्यांनी फेब्रुवारच्या अखेरपर्यंत बिहार सरकार निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतेय की नाही याकडे लक्ष ठेवणार असल्याचे म्हटले. बिहारमध्ये सरलेल्या वर्षात विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये जनता हरली अन् व्यवस्था जिंकली. एनडीएच्या नेत्यांनी लोकशाहीला धनशाही आणि मशीनशाही बनवले. कारस्थान रचून फसवणूक, हातचलाखीच्या माध्यमातून निवडणुकीत विजय मिळवला गेला, असा आरोप त्यांनी केला. सरलेल्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यात बिहार राज्य निवडणुकीला सामोरे गेले. त्या निवडणुकीत एनडीए आणि राजदच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या महाआघाडीत अटीतटीची फाईट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. प्रत्यक्षात एनडीएने प्रचंड स्वरूपाचा एकतर्फी विजय मिळवत बिहारची सत्ता राखली. तर, महाआघाडीच्या पदरी नामुष्कीजनक पराभव पडला. त्या निकालावर राजद, कॉंग्रेससारखे महाआघाडीतील घटक अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.