लखनौ/श्रीनगर: काश्मीरपासून हिमाचल प्रदेशापर्यंतच्या डोंगराळ भागात झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे संपूर्ण उत्तर भारत गारठला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह १२ राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे झालेल्या विविध रस्ते अपघातांत ५ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील ५३ शहरांना दाट धुक्याने वेढले आहे. दृश्यमानता (Visibilty) अत्यंत कमी झाल्यामुळे १० जिल्ह्यांमध्ये सुमारे ४० वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातात जीवितहानी झाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. धुक्याचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला असून, ‘वंदे भारत’सह १०० हून अधिक गाड्या विलंबाने धावत आहेत. अमृतसर आणि दिल्लीत सकाळी दृश्यमानता २० मीटरपेक्षाही कमी नोंदवण्यात आली. तापमानाचा पारा घसरला; शाळांना सुटी थंडीची लाट पाहता नोएडा, ग्रेटर नोएडा, सहारनपूर आणि बदायूंमधील इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तापमानाचा विचार करता, पंजाबमधील नवांशहर येथे ०.९°C, हरियाणातील भिवानीमध्ये १.५°C आणि मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये २.५°C तापमानाची नोंद झाली. काश्मीरमधील पुलवामा येथे पारा उणे ४.६°C पर्यंत घसरला असून उत्तराखंडमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाईनमधील पाणीही गोठले आहे. पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज १८ जानेवारी: उत्तर भारतात थंडी आणि दाट धुक्याचे सावट कायम राहील. पहाटे आणि संध्याकाळी वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डोंगराळ भागात हलकी बर्फवृष्टी सुरूच राहण्याची शक्यता आहे. १९ जानेवारी: थंडीचा जोर कायम राहील आणि तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि आसपासच्या परिसरात हलक्या पावसाची (मावठ) शक्यता वर्तवण्यात आली आहे.