नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील चौथा टी-20 सामना दाट धुके आणि प्रदुषणामुळे रद्द करण्याची नामुष्की ओढवली. त्यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मिश्कील शैलीत सल्ला दिला. डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत उत्तर भारताऐवजी दक्षिण भारतात सामने खेळवले जावेत, असे त्यांनी सुचवले. तसेच, क्रिकेटप्रेमींना फसवणूक झाल्याचे वाटू देऊ नका, अशी टिप्पणीही केली. उत्तरप्रदेशच्या लखनौमध्ये बुधवारी होणारा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. विशेषत: सामना पाहण्यासाठी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थिती लावलेल्यांचा मोठाच हिरमोड झाला. अशात क्रिकेटशौकिन असणाऱ्या थरूर यांची संसदेच्या आवारात कॉंग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांच्याशी भेट झाली. शुक्ला हे बीसीसीआयचे उपाध्यक्षही आहेत. त्यांच्याशी हसत-खेळत गप्पा मारताना सध्याच्या काळात दक्षिण भारतात खेळायला या असे थरूर यांनी म्हटले. नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. सध्याच्या दिवसांत उत्तर भारतात सर्वच ठिकाणी धुके दाटते. त्यामुळे क्रिकेटपटूंना चेंडू दिसणेही अवघड होऊन बसते. साहजिकच, या कालावधीत दक्षिण भारतात सामने आयोजित केले जावेत असे मला वाटते. केरळमधील थिरूवनंतपूरम या माझ्या मतदारसंघात चांगले स्टेडियम आहे. तिथे या आणि खेळा. सामन्यांचे आयोजन करताना हवामानाची स्थिती विचारात घेतली जावी, असे थरूर बीसीसीआयला उद्देशून म्हणाले.