पाटणा : बांगलादेशात सध्या जमावाचे राज्य आणि अस्थिरता असून तेथील संबंधित नेत्यांनी याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. ही अशांतता बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशांवर प्रतिकूल परिणाम करू शकते. सर्वप्रथम तेथील नेत्यांनी लोकशाही मूल्यांचा आदर करुन शांतता प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेस खासदार आणि परराष्ट्र व्यवहार संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी केले आहे. रविवारपासून राजगीर येथे सुरू झालेल्या नालंदा साहित्य महोत्सवात सहभागी होण्यापूर्वी पाटणा विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते. थरूर म्हणाले की, बांगलादेशमध्ये फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. आम्हाला तिथे लोकशाही परत यावी असे वाटते, परंतु तिथली परिस्थिती ज्या प्रकारे आहे ती खूप चिंताजनक आहे. अशी परिस्थिती दोन्ही देशांसाठी चांगली नाही; आम्हाला तिथे शांतता हवी आहे. थरूर यांनी बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात कथित धर्मनिंदेच्या आरोपावरून २७ वर्षीय हिंदू तरुण दीपू चंद्र दास याच्या जमावाकडून झालेल्या हत्येबद्दलही चिंता व्यक्त केली. त्यांनी देशाच्या हंगामी सरकारला विचारले की, गुन्हेगारांना जबाबदार धरण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत. परराष्ट्र व्यवहाराच्या संसदीय स्थायी समितीनेही म्हटले आहे की, आम्हाला बांगलादेशसोबत चांगले संबंध हवे आहेत. थरूर यांची ही टिप्पणी बांगलादेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आली आहे.