नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि इतर 10 जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत आरोपपत्र दाखल केले आहे. 2024 मधील एका बनावट बँक गॅरंटीशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ही गॅरंटी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसईसीआय) कडून एक टेंडर मिळवण्यासाठी जमा करण्यात आली होती. ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, रिलायन्स ग्रुपचे अधिकारी या फसवणुकीबद्दल पूर्णपणे माहितीगार होते. ईडीने दावा केला की, रिलायन्स ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी कॉनिव्हन्स आणि माल फाइड इंटेंशन (वाईट हेतूने) एसईसीआयचे टेंडर मिळवण्यासाठी बनावट गॅरंटी जमा केली. परदेशी बँकांकडून बनावट गॅरंटी तयार करण्यात आल्या आणि एसबीआयच्या नावावर बनावट एंडोर्समेंट करण्यात आले. तसेच निधी चुकीच्या पद्धतीने वळवण्यात आले, बनावट कागदपत्रे वापरण्यात आली. रिलायन्स पॉवरने वाईट हेतूने बिस्वाल ट्रेडलिंकच्या सेवा घेतल्या जेणेकरून फर्स्ट रँड बँक (फिलिपिन्स) आणि एसीई इन्व्हेस्टमेंट बँक (मलेशिया) कडून बनावट हमीपत्रे तयार करता येतील. हे सर्व मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा आहे.