जालोर: राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका पंचायतीने १५ गावांतील महिला आणि मुलींना स्मार्टफोन किंवा कॅमेरा असलेला मोबाईल वापरण्यास मज्जाव केला आहे. पंचायतीचा हा निर्णय एखाद्या ‘तुघलकी’ फरमानासारखा असल्याची चर्चा आता रंगू लागली असून, २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. केवळ की-पॅड फोन वापरण्याची मुभा – पंचायतीने जारी केलेल्या आदेशानुसार, या १५ गावांतील महिलांना आता केवळ साध्या की-पॅड फोनचा वापर करता येईल. स्मार्टफोन्समुळे मुले बिघडतात आणि त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो, असा दावा पंचायतीने केला आहे. विशेष म्हणजे, केवळ सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजाऱ्यांच्या घरी जातानाही महिलांना मोबाईल सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिक्षणासाठी घराबाहेर मोबाईल नेण्यास मनाई – या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना समाजाचे अध्यक्ष सुजनाराम चौधरी आणि पंच हिम्मताराम यांनी सांगितले की, देवाराम कारनोल यांनी हा प्रस्ताव मांडला होता, ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ज्या मुली शिक्षण घेत आहेत, त्यांना मोबाईलची गरज असल्यास त्यांनी केवळ घरातच त्याचा वापर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. सामाजिक माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया – पंचायतीच्या या अजब निर्णयाचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. काही लोकांच्या मते, मुलांच्या आरोग्यासाठी आणि स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. बहुतांश नागरिकांनी याला महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे पाऊल म्हटले असून, आधुनिक काळात असा भेदभाव करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.