नवी दिल्ली: माजी अग्निवीरांच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सीमा सुरक्षा दलातील (BSF) कॉन्स्टेबल पदाच्या भरती प्रक्रियेत बदल करत, माजी अग्निवीरांचे आरक्षण आता १० टक्क्यांवरून थेट ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता BSF मधील निम्म्या जागा अग्निवीरांसाठी राखीव असतील. आरक्षणाचे नवे समीकरण – गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत राजपत्रातील (Gazette Notification) माहितीनुसार, दरवर्षी होणाऱ्या BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये ५०% जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव राहतील. उर्वरित जागांपैकी १०% जागा माजी सैनिकांसाठी (Ex-Servicemen) आणि साधारण ३% जागा ‘कॉम्बॅटाइज्ड कॉन्स्टेबल’ (ट्रेड्समन) यांच्या समायोजनासाठी ठेवल्या जातील. वयोमर्यादेत मोठी सवलत – केवळ आरक्षणच नव्हे, तर वयोमर्यादेतही अग्निवीरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अग्निवीर योजनेच्या पहिल्या तुकडीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत मिळेल. त्यानंतरच्या सर्व तुकड्यांमधील माजी अग्निवीरांना वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट दिली जाईल. शारीरिक चाचणीची (Physical Test) गरज नाही – भरती प्रक्रियेतील सर्वात मोठा बदल म्हणजे माजी अग्निवीरांना आता शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) द्यावी लागणार नाही. त्यांना यातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. मात्र, वैद्यकीय चाचणी (Medical Test) आणि अन्य निकष केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य राहतील. भरती प्रक्रिया कशी होणार? नव्या नियमांनुसार भरती दोन टप्प्यात विभागली जाईल. नोडल फोर्सद्वारे भरतीमध्ये ५०% राखीव जागांवर थेट नोडल फोर्समार्फत भरती केली जाईल. SSC मार्फत भरतीमध्ये उर्वरित ४७% जागांची भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे (SSC) केली जाईल. महिला उमेदवारांसाठीच्या जागांची संख्या दरवर्षीच्या आवश्यकतेनुसार निश्चित केली जाईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अग्नीवीर सैन्यदलातून सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.