नवी दिल्ली: काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘मनरेगा बचाव संग्राम’ या राष्ट्रीय मजूर संमेलनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चायवाला’ प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, खरगे यांनी सरकारवर गरिबांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप केला. “तुम्ही केवळ भाषणातून मते मिळवण्यासाठी नाटक करत आहात, एकदा चार दिवस मनरेगाची मजुरी करून पहा, मग गरिबांचे हाल समजतील,” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी मोदींना लक्ष्य केले. ‘चायवाला’ प्रतिमेवर तिखट प्रहार पंतप्रधानांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत खरगे म्हणाले की, “लोकांची मते मिळवण्यासाठी तुम्ही नेहमी ‘मी चहावाला आहे’ असे सांगत आलात. पण खरंच तुम्ही कधी स्वतः चहा बनवला आहे का? कधी किटली घेऊन कोणत्या माणसाला चहा दिला आहे का? हे सर्व निव्वळ नाटक असून गरिबांना दाबण्याची ही तुमची जुनी पद्धत आहे.” मनरेगा संपवणे म्हणजे गांधीजींचे नाव पुसण्याचा प्रयत्न – केंद्र सरकारने मनरेगा योजना बंद करून त्याजागी ‘विकसित भारत-गारंटी फॉर रोजगार आजीविका मिशन’ (ग्रामीण) आणल्याचा दावा करत खरगे यांनी संताप व्यक्त केला. “मनरेगा संपवणे म्हणजे महात्मा गांधींचे नाव आणि ग्रामस्वराज्याची संकल्पना लोकांच्या स्मृतीतून पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. हे केवळ गरिबांच्या हक्कांवरील आक्रमण नसून लोकशाहीच्या मुळावर घाला आहे,” असे खरगे यांनी नमूद केले. बजेट अधिवेशनात धारेवर धरणार या संमेलनाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. देशभरातून आलेल्या मजुरांनी आपल्या कामाच्या ठिकाणची एक मुठ माती आणून ती झाडांना अर्पण केली, जे मजुरांच्या संघर्षाचे प्रतीक मानले गेले. खरगे यांनी स्पष्ट केले की, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस या मुद्द्यावर सरकारला पूर्ण ताकदीने धारेवर धरेल. काय आहे ‘मनरेगा बचाओ संग्राम’? काँग्रेसने १० जानेवारीपासून ४५ दिवसांचे देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. यूपीए सरकारच्या काळात सुरू झालेला ‘काम करण्याचा अधिकार’ देणारा मनरेगा कायदा पुन्हा मूळ स्वरूपात लागू करावा आणि ग्रामपंचायतींचे अधिकार अबाधित ठेवावेत, अशी काँग्रेसची प्रमुख मागणी आहे.