Indian Army : भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणि मैत्रीचा वारसा पुढे नेत, भारतीय सैन्याने (Indian Army) सोमवारी नेपाळ लष्कराला ५० लष्करी उपयुक्तता वाहने सुपूर्द केली. भारत-नेपाळ सीमेवर हा हस्तांतरण सोहळा पार पडला. उभय देशांच्या सैन्यांमधील हा अतुट विश्वास आणि मैत्रीचा बंध असल्याचे भारतीय लष्कराने याप्रसंगी नमूद केले. भारतीय लष्कराने एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर या संदर्भातील माहिती आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. सीमेवर प्राथमिक हस्तांतरण झाल्यानंतर, आता काठमांडू येथे आयोजित एका विशेष समारंभात नेपाळमधील भारताचे राजदूत ही वाहने औपचारिकपणे नेपाळ लष्कराकडे सुपूर्द करतील. नेपाळ लष्कराची कार्यक्षमता आणि क्षमता वाढवण्यासाठी भारतीय लष्कराने दिलेले हे योगदान दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणारे ठरेल, असा विश्वास लष्कराने व्यक्त केला आहे. म्यानमार सैन्यासाठी इन्फंट्री वेपन सिम्युलेटर कार्यान्वित नेपाळसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांबरोबरच भारताने म्यानमारशी असलेले लष्करी सहकार्यही अधिक विस्तारले आहे. भारतीय लष्कराच्या सिम्युलेटर डेव्हलपमेंट डिव्हिजनच्या एका फिरत्या प्रशिक्षण पथकाने म्यानमारमधील बाटू येथील कॉम्बॅट फोर्सेस स्कूलमध्ये १२-लेनचे आधुनिक इन्फंट्री वेपन ट्रेनिंग सिम्युलेटर बसवून ते कार्यान्वित केले आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय पथकाने म्यानमार लष्कराच्या जवानांना या प्रणालीची हाताळणी, तांत्रिक देखभाल आणि प्रत्यक्ष युद्धाभ्यासाचे प्रशिक्षणही दिले आहे.