रोहतक: साध्वींवरील बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आला आहे. रोहतकच्या सुनारिया जेलमधून सोमवारी त्याची ४० दिवसांच्या पॅरोलवर सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये शिक्षा सुनावल्यापासून राम रहीमची जेलबाहेर येण्याची ही १५ वी वेळ आहे. सिरसा मुख्यालयात वास्तव्य डेराचे प्रवक्ते आणि विधिज्ञ जितेंद्र खुराना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ४० दिवसांच्या पॅरोल कालावधीत राम रहीम हरियाणातील सिरसा येथील डेरा मुख्यालयातच राहणार आहे. यापूर्वी अनेकदा तो उत्तर प्रदेशातील बागपत येथील आश्रमात मुक्कासाला होता, मात्र यावेळी तो मुख्य डेऱ्यात परतणार आहे. वारंवार मिळणाऱ्या सवलतींवरून वाद राम रहीमला सातत्याने मिळणाऱ्या पॅरोल आणि फर्लोमुळे पुन्हा एकदा कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी: ऑगस्ट २०२५: ४० दिवसांची पॅरोल. एप्रिल २०२५: २१ दिवसांची फर्लो. जानेवारी २०२५: दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी ३० दिवसांची पॅरोल. ऑक्टोबर २०२४: हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी २० दिवसांची पॅरोल. निवडणुकांच्या काळात राम रहीमला मिळणाऱ्या या सवलतींमुळे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीसह (SGPC) अनेक शीख संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाच्या या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली आहे. काय आहे पार्श्वभूमी? गुरमीत राम रहीमला २५ ऑगस्ट २०१७ रोजी पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोन महिला अनुयायांवर (साध्वींवर) बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून २०-२० वर्षांच्या दोन शिक्षा सुनावल्या होत्या. त्यानंतर एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणीही त्याला दोषी ठरवण्यात आले होते. २०१७ मध्ये त्याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता, ज्यामध्ये सुमारे ४० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, मे २०२४ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने २००२ मधील रणजीत सिंह हत्या प्रकरणातून राम रहीमची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, बलात्कार आणि पत्रकार हत्या प्रकरणात तो अद्याप शिक्षा भोगत आहे.