नवी दिल्ली : गोव्यातील भीषण अग्नितांडवानंतर देशाबाहेर पलायन करणारे नाइटक्लबचे मालक लुथ्रा बंधूंचे थायलंडमधून प्रर्त्यापण करण्यात आले. त्यांना दिल्लीत दाखल होताच भारतीय यंत्रणांनी ताब्यात घेतले. गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन या नाइटक्लबमध्ये ६ डिसेंबरची मध्यरात्र उलटल्यानंतर भीषण आग लागली. त्या दुर्घटनेत २५ जण मृत्युमुखी पडले. त्यानंतर गौरव (वय ४४) आणि सौरभ (वय ४०) हे लुथ्रा बंधू देशाबाहेर पसार झाल्याचे समोर आले. ते थायलंडमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोवा पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयच्या माध्यमातून इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. त्यापाठोपाठ थायलंड पोलिसांनी लुथ्रा बंधूंना ताब्यात घेतले. त्यांना परत आणण्यासाठी भारतीय यंत्रणांनी तातडीने हालचाली केल्या. संबंधित प्रयत्न यशस्वी ठरल्याने लुथ्रा बंधूंची थायलंडमधून भारतात पाठवणी करण्यात आली. इंडिगो कंपनीच्या विमानातून त्यांना दिल्लीला पाठवण्यात आले. विमानतळावर उतरताच त्यांना दिल्ली आणि गोवा पोलिसांनी संयुक्तपणे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कोठडीत घेण्याची परवानगी गोवा पोलिसांना दिली.