पणजी : गोव्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, गोवा सरकारने बुधवारी एलोन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला. या भागीदारीअंतर्गत, मर्यादित किंवा अजिबात स्थलीय नेटवर्क कव्हरेज नसलेल्या निवडक भागांमध्ये हाय-स्पीड सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये सरकारी शाळा, आरोग्य सेवा केंद्रे आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सुविधा यांचा समावेश असेल, असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग आणि स्टारलिंक यांच्यात हा करार मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आयटी मंत्री रोहन खौंटे, मुख्य सचिव व्ही. कॅन्डावेलो आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. स्टारलिंककडून भारतातील प्रमुख प्रभाकर जयकुमार यांनी प्रतिनिधित्व केले. करारानुसार, डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवणे, आपत्कालीन प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमता मजबूत करणे, तसेच गोव्यात स्मार्ट प्रशासन उपक्रमांना पाठिंबा देणे या क्षेत्रांमध्ये दोन्ही बाजू सहकार्याच्या शक्यता तपासतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्य सरकार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यास आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यास कटिबद्ध आहे. स्टारलिंकसोबतची ही भागीदारी डिजिटलदृष्ट्या सक्षम गोव्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले. माहिती व तंत्रद्न्यान मंत्री रोहन खौंटे यांनी या सहकार्यामुळे डिजिटल दरी कमी होईल आणि प्रशासन अधिक कार्यक्षम व प्रतिसादक्षम बनेल, असा विश्वास व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा सुधारून गोव्याला गुंतवणूक, पर्यटन आणि प्रतिभेसाठी आकर्षक केंद्र बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. राबवणार पायलट प्रोजेक्ट सामंजस्य कराराचा भाग म्हणून, स्टारलिंकने गोव्यातील दुर्गम आणि वंचित भागांमध्ये कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स पायलट तत्त्वावर राबवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, आपत्कालीन तयारी वाढवणे, क्षमता-विकास व प्रशिक्षण उपक्रम हाती घेणे आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त वापरासाठी परवडणाऱ्या दररचना तपासण्यावरही भर दिला जाणार आहे.