Kerala Elections 2026 – केरळमध्ये भाजप हा अल्प प्रभाव असणारा राजकीय खेळाडू आहे. त्या पक्षाची किंगमेकर बनण्याइतकीही प्रभाव पडण्याची शक्यता नाही. निवडणुकीत भाजपने खाते उघडणेही मोठे ठरेल, असे राजकीय विश्लेषण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केले. डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता असणाऱ्या केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, केरळमधील खासदार आणि कॉंग्रेसचे महत्वाचे नेते असणाऱ्या थरूर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी यावेळच्या निवडणुकीतही डाव्या पक्षांची आघाडी विरूद्ध कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी अशीच मुख्य लढत होण्याचे भाकीत केले. केरळमध्ये तिरंगी लढत होणार नाही. भाजप हा विधानसभेत शून्य जागा असणारा पक्ष आहे. सध्याच्या शुन्याऐवजी एक, दोन किंवा तीन जागा जिंकल्या तरी तो पक्ष मोठ्या कामगिरीबद्दल स्वत:चे अभिनंदन करेल. भाजपची सध्या ती स्थिती आहे, असे भाष्य त्यांनी केले. यावेळची निवडणूक अटीतटीची ठरण्याची शक्यता आहे. साहजिकच, प्रत्येक जागेला आणि प्रत्येक मताला महत्व असेल. त्यामुळे आम्ही भाजपकडे दुर्लक्ष करणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.