कोलकाता : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने चालू असलेल्या एसआयआर प्रक्रियेच्या चिंतेमुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या पारा पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून घटनेच्या २३ दिवसांनंतर गुन्हा नोंदवण्यात आला. एफआयआरमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे आरोप करण्यात आले असून, कोणत्याही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचे नाव थेट नमूद करण्यात आलेले नाही. पारा ब्लॉकमधील चौताला गावातील दुर्जन माझी यांनी २९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्याच दिवशी काही तासांनी त्यांना ब्लॉक कार्यालयात एसआयआर संदर्भातील सुनावणीसाठी हजर राहायचे होते. कुटुंबीयांचा दावा आहे की मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेबाबतच्या मानसिक तणावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने एसआयआर प्रक्रियेद्वारे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाकडून अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. याच जिल्ह्यातील मानबाजार येथे ३२ वर्षीय आदिवासी व्यक्तीने एसआयआर सुनावणीची नोटीस मिळाल्यानंतर आत्महत्या केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.