नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील कार स्फोट प्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली. ती महत्वपूर्ण कारवाई राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केली. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबरला कार स्फोट घडवण्यात आला. त्यामध्ये १५ जण मृत्युमुखी पडले. ती कार डॉक्टर उमर-उन-नबी चालवत होता. त्यामुळे स्फोट प्रकरणाशी डॉक्टर आणि उच्चशिक्षितांचा समावेश असणाऱ्या व्हाइट कॉलर दहशतवादी जाळ्याचे लागेबांधे असल्याचे समोर आले. त्याच जाळ्याचा भाग असणाऱ्या डॉक्टर बिलाल नासीर मल्ला याला एनआयएने अटक केली. तो मूळचा उत्तर काश्मीरच्या बारामुल्लाचा रहिवासी आहे. तो उमरच्या संपर्कात होता. बिलालने स्फोटाशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. त्याला अटकेनंतर दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. त्याच्या चौकशीतून स्फोट प्रकरणाशी संबंधित महत्वाची माहिती मिळण्याची चिन्हे आहेत. त्या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे.