अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर परिसरात शनिवारी सकाळी खळबळजनक घटना घडली. मंदिर संकुलात घुसून नमाज पठण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पुरूषांना आणि एका तरुणीला सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडले. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी आपली ओळख काश्मीरचे रहिवासी म्हणून सांगितली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही संशयित राम मंदिराच्या D1 गेटमधून आत शिरले होते. त्यानंतर मुख्य मंदिरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या ‘सीता रसोई’ जवळ एकाने नमाज पठण करण्यास सुरुवात केली. त्यांचा संशयास्पद वावर पाहून तेथे तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या (SSF) जवानांनी त्यांना तात्काळ रोखले. पकडण्यात आलेल्यापैकी एकाचे नाव अबू अहमद शेख असून तो काश्मीरमधील शोपियानचा रहिवासी असल्याचे समजते, तर मुलीचे नाव सोफिया आहे. तिसऱ्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर राम मंदिरात प्रवेशावेळी कडक सुरक्षा तपासणी केली जात असली, तरी आधार कार्ड किंवा ओळखपत्रांची सक्ती नसल्याचा फायदा या तिघांनी घेतल्याचे बोलले जात आहे. ताब्यात घेतल्यानंतर यांनी घोषणाबाजी केल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर गुप्तचर यंत्रणा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सतर्क झाले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत रोज दीड लाख भाविक येत आहेत. मंदिर उडवून देण्याच्या वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आता येथे NSG स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. सध्या मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी SSF कडे असली, तरी या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.