नवी दिल्ली: “दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांनी ४० किलो स्फोटकांचा वापर केला होता, मात्र सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असून तब्बल ३ टन स्फोटक साहित्याचा साठा जप्त करण्यात आला आहे,” अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली. दिल्लीत आयोजित ‘दहशतवाद विरोधी संमेलन-२०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत आता ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानेच काम करेल, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. तपास यंत्रणांच्या कामगिरीचे कौतुक १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात १५ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या प्रकरणाचा तपास करताना जम्मू-काश्मीर पोलीस आणि एनआयएने (NIA) अत्यंत प्रभावी कामगिरी केल्याचे शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, “हा तपास म्हणजे केवळ ‘रुटीन पोलिसिंग’ नसून सखोल आणि ठोस तपासाचे एक उत्तम उदाहरण आहे. एका सतर्क अधिकाऱ्याच्या जागरूकतेमुळे देश किती मोठ्या संकटातून वाचू शकतो, हे या कारवाईने सिद्ध केले आहे.” नऊ आरोपींना बेड्या, ‘डॉ. उमर’ कनेक्शन उघड लाल किल्ला स्फोटाप्रकरणी आतापर्यंत डॉ. उमर-उन-नबी याच्याशी संबंधित ९ दहशतवाद्यांना एनआयएने अटक केली आहे. या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून, मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावला आहे. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव पाकिस्तानला कडक इशारा देताना गृहमंत्री म्हणाले की, “बैसारन खोऱ्यातील हल्ल्याद्वारे दहशतवाद्यांना काश्मीरचा विकास आणि पर्यटन धोक्यात आणायचे होते. मात्र, भारतीय सैन्याने तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.” यावेळी त्यांनी दोन विशेष मोहिमांचा उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूर मोहिमेद्वारे स्फोटाचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारांना शिक्षा देण्यात आली. तर ऑपरेशन महादेव या मोहिमेद्वारे दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करणाऱ्या जाळ्याचा नायनाट करण्यात आला. “ही पहिलीच वेळ आहे की, केवळ प्रत्यक्ष हल्लेखोरच नव्हे, तर त्यांना रसद पुरवणाऱ्यांनाही इतक्या वेगाने आणि कठोरपणे संपवण्यात आले आहे. भारत सरकारने आपल्या गुप्तचर संस्थांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी आकांचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत,” असेही अमित शाह यांनी ठामपणे सांगितले.