West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस (टीएमसी)ला मोठा धक्का बसला आहे. कृष्णानगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार अभिनव भट्टाचार्य यांचे नामांकन निवडणूक आयोगाने रद्द केले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 9A अंतर्गत ही कारवाई केली. या कलमानुसार, एखाद्या उमेदवाराचा सरकारशी व्यावसायिक संबंध किंवा करार असल्यास तो निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नामांकन भरताना भट्टाचार्य हे राज्य सरकारशी संबंधित कराराच्या कामात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हितसंबंधांच्या संघर्षामुळे त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले. हेही वाचा – ओवैसींचा मोठा निर्णय! हुमायूं कबीर यांच्याशी युती संपुष्टात; बंगालमध्ये AIMIM स्वबळावर लढणार या घडामोडीनंतर टीएमसीने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते सोमनाथ दत्ता आता कृष्णानगर उत्तरमधून अधिकृत उमेदवार असतील. त्यांनी गुरुवारीच दुसरे उमेदवार म्हणून आपले नामांकन दाखल केले होते. भट्टाचार्य यांनी या निर्णयाला दुर्दैवी म्हटले असून पुढील पावले पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार उचलणार असल्याचे सांगितले. कृष्णानगरच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही या निर्णयाची पुष्टी केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शांतिपूर येथील सभेत भट्टाचार्य यांना उमेदवार म्हणून जाहीर केले होते. मात्र त्यांच्या नामांकनाबाबत अडचण निर्माण होऊ शकते, याची कल्पना पक्षाला होती. त्यामुळेच शेवटच्या क्षणी सोमनाथ दत्ता यांचा पर्यायी अर्ज दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अशाच प्रकारची घटना 2024 मध्ये भाजपसोबतही घडली होती. बीरभूम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार देबाशीष धर यांचे नामांकन ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे रद्द करण्यात आले होते. त्यानंतर देबतनू भट्टाचार्य यांना पक्षाने उमेदवार घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रियेत कायदेशीर अटींचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 294 विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून 4 मेला निकाल जाहीर होणार आहेत.