छत्रपती संभाजीनगर: “सत्ताधाऱ्यांकडे सत्तेची आणि पैशांची मस्ती असेल, पण माझ्याकडे जनतेची शक्ती आहे. आजची ही अभूतपूर्व गर्दी पाहून मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत आहे. ही गर्दीच सिद्ध करते की, निष्ठा विकली जात नाही,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर – भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या ‘ताटात जेवल्याच्या’ विधानाचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, “रावसाहेब दानवे हे पडलेले खासदार आहेत, पण त्यांची मस्ती अजून उतरलेली नाही. दानवे, आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही, उलट शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला जगवले आहे, हे विसरू नका. जर तुम्हाला आमचा इतकाच विट आला होता, तर आजही आमचेच प्रकल्प आणि योजना का वापरत आहात?” विकासकामांवरून सरकारला घेरले शहरातील पाणीप्रश्नावर भाष्य करताना उद्धव ठाकरे भावूक झाले. “मी मुख्यमंत्री असताना संभाजीनगरच्या पाणी योजनेसाठी केवळ निधी दिला नव्हता, तर त्याचे प्रत्यक्ष काम मार्गी लावले होते. या गद्दारांनी सरकार पाडले नसते, तर आज मी तुम्हाला पाणी देऊन दाखवले असते. आज संभाजीनगरमध्ये विकासकामे रखडलेली पाहून निराशा होते,” असे ते म्हणाले. तसेच, अजित पवारांच्या ‘नशामुक्त संभाजीनगर’च्या जाहिरातींवरून त्यांनी टोला लगावला की, ज्यांना शहर पाणीदार करता आले नाही, ते शहर नशामुक्त काय करणार? भाजपवर ‘दोगलेपणा’चा आरोप पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून त्यांनी भाजपच्या ‘हिंदुत्वा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्या आरोपींवर तुम्ही साधूंच्या हत्येचा आरोप केला, त्यांनाच पक्षात प्रवेश देता? तुमचा आरोप खोटा होता की तुम्ही स्वतः ‘दोगले’ आहात? ‘गुंड प्रथम, भ्रष्टाचार प्रथम आणि बलात्कारी प्रथम’ हेच आता भाजपचे ब्रीदवाक्य झाले आहे,” अशी टीका त्यांनी केली. अजित पवारांच्या घोटाळ्याचा जाब अजित पवारांच्या समावेशावरून त्यांनी थेट मोदी-शहांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. “ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप भाजपनेच केले, त्यांनाच आता सत्तेत मांडीला मांडी लावून बसवले आहे. जर तो घोटाळा खरा असेल तर कारवाई करा, अन्यथा त्यांची जाहीर माफी मागा,” असे आव्हान ठाकरेंनी दिले. शेवटी, ही लढाई केवळ शिवसेनेच्या अस्तित्वाची नसून जनतेच्या भविष्याची आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. “मी माझ्या घराण्याची आणि शिवसेनाप्रमुखांची परंपरा पुढे नेत आहे. ज्यांना आमची लाज वाटते, त्यांनी माझ्या वडिलांचे नाव वापरणे थांबवावे,” असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला.