नवी दिल्ली : तमिळ अभिनेते आणि तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय यांना सीबीआयने पुन्हा समन्स बजावले आहे. त्यांना चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीसाठी दुसऱ्यांदा १९ जानेवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सीबीआयच्या पहिल्या समन्सनुसार विजय सोमवारी त्या केंद्रीय यंत्रणेच्या दिल्लीतील मुख्यालयात हजर राहिले. त्यांची सुमारे ६ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा मंगळवारी बोलावण्यात आले. मात्र, पोंगल सण असल्याने पुढील आठवड्यात बोलावण्याची विनंती विजय यांनी केली. ती मान्य करत सीबीआयने त्यांना दुसरे समन्स बजावले. विजय यांच्याआधी सीबीआयने टीव्हीकेच्या काही पदाधिकाऱ्यांचीही चौकशी केली. तमिळनाडूत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या राजकीय रणसंग्रामाला ताकदीने सामोरे जाण्यासाठी टीव्हीकेने खूप आधीपासून तयारी सुरू केली. त्याचाच भाग म्हणून विजय यांनी काही महिन्यांपूर्वी राज्यव्यापी जनसंपर्क मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेदरम्यान सरलेल्या वर्षातील २७ सप्टेंबरला त्यांचा करूरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी अनियंत्रित गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. त्या दुर्घटनेत ४१ जणांना जीव गमवावा लागला. संबंधित प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय करत आहे.