पाटणा : बिहारमधील एनडीए सरकारवर तीव्र टीका करत आरजेडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तेजस्वी यादव यांनी शनिवारी मुख्यमंत्री नितीश कुमार हे लोकांचे नसून अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री असल्याचा आरोप केला. आरजेडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या यादव यांनी सांगितले की, मागील विधानसभा निवडणुकीत जनतेचा पराभव झाला असून प्रशासकीय यंत्रणेचा विजय झाला आहे. लोक हारा, तंत्र जीता असे म्हणत त्यांनी आरोप केला की, नितीश कुमार प्रशासनाच्या आधारावर सत्ता टिकवून आहेत आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. मागील महिन्यात झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपली राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचा उल्लेख करत यादव म्हणाले की, लालू प्रसाद यांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने पक्ष अधिक मजबूत करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. जातीयवादी शक्तींविरुद्ध लढा देत आंदोलनांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ते पूर्ण ताकदीने पार पाडतील, असे त्यांनी स्पष्ट केले. भिती आणि दहशतीची राजवट यादव यांनी आरोप केला की, एनडीए सरकारने लोकशाहीचे रूपांतर भीती आणि दहशतीच्या राजवटीत केले आहे. खोट्या केसेस, बनावट खटले आणि प्रशासकीय यंत्रणेच्या गैरवापरातून निवडणुका जिंकल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत असले तरी आरजेडी खंबीरपणे लढत राहील, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारवरही टीका करत यादव म्हणाले की, लोकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असून शेतकऱ्यांना एमएसपी मिळत नाही आणि लहान व्यावसायिकांवर अन्याय होत आहे. १७ फेब्रुवारी रोजी जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाटण्यात स्मृती कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.