पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे सर्व २५ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. ते कधीही आमच्यात सामील होऊ शकतात. तेजस्वी यादव यांचा पक्ष आता संपला आहे आणि ते शून्यावर बाद होतील असा खळबळजनक दावा बिहारचे कृषीमंत्री रामकृपाल यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव पराभव सहन करू शकत नाहीत. त्यांना जनतेत जाण्याची लाज वाटत होती, म्हणून ते परदेशात पळून गेले अशा शब्दांत त्यांनी परदेशात गेलेल्या तेजस्वी यांना लक्ष्य केले. रामकृपाल यादव यांच्या या विधानानंतर बिहारचे राजकारण चांगले तापले असून राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सरकारने यंत्रणा व्यवस्थापनाद्वारे २०२ जागांचा जनादेश कसा तरी मिळवला आहे. असे असूनही, ते अस्वस्थ आहेत आणि त्यांना विरोधी पक्षमुक्त विधानसभा हवी आहे अशी टीका तिवारी यांनी केली. तर रामकृपाल यादव यांना शेतकऱ्यांची काळजी नाही. कृषी मंत्री असूनही त्यांना त्यांच्या दुर्दशेची काळजी नाही अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते ज्ञान रंजन यांनी केली. दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव परदेशात असून, त्यांचे वडील लालू प्रसाद दिल्लीत आहेत. त्यांच्यावर नुकतीच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बिहारमधील त्यांचे १० सर्कुलर रोडवरील निवासस्थान रिकामे करण्याची प्रक्रिया देखील रात्री उशिरा सुरू झाली. निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस सुमारे एक महिन्यापूर्वी जारी करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना ३९ हार्डिंग रोडवरील निवासस्थान देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत निवासस्थान रिकामे केले जाणार नाही असे राजदच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटले होते. त्यामुळे १० सर्कुलर रोडवरील निवासस्थानावरूनही बरेच राजकारण तापले होते.