Suvendu Adhikari : भाजप नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी आरोप केला की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बांगलादेशी घुसखोरांचे संरक्षण करत आहेत आणि याच कारणामुळे त्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला विरोध करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता सत्ताधारी सरकार उलथून टाकेल, असा दावाही त्यांनी केला. अधिकारी हे पश्चिम बंगालसाठी भाजपचे प्रभारी आणि बिहारचे मंत्री मंगल पांडे यांना भेटण्यासाठी पाटणा येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ममता बॅनर्जींची भूमिका आता पूर्णपणे उघड झाली असून त्या कथित घुसखोरांना संरक्षण देत आहेत. यामुळेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने अतिरेक्यांचे सरकार हटवण्याचा निर्धार केला असून निवडणुकीनंतर राज्यात सनातन सरकार स्थापन होईल, असा दावा अधिकारी यांनी केला. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर आता पक्षाचे लक्ष पश्चिम बंगालकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंग (बिहार) आणि कलिंग (ओडिशा) नंतर आता बंगालची वेळ आहे. यावेळी बंगालमध्ये केवळ राष्ट्रवादी सरकार सत्तेवर येईल, असे अधिकारी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही. न्यायव्यवस्थेवर दबाव टाकल्याचा आरोप पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर न्यायव्यवस्थेवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांची सर्वोच्च न्यायालयातील उपस्थिती ही कथित सदोष मतदार यादीचे संरक्षण करण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला. बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या आणि मृत मतदारांची नावे यादीत ठेवण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचे ते म्हणाले. भट्टाचार्य यांनी सिंगूरमधील औद्योगिक कोंडीसाठी टीएमसीच्या भू-धोरणालाही जबाबदार धरले आणि भाजप कार्यकर्त्यांना मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अडथळे येत असल्याचा आरोप केला.