बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या नावे रेकॉर्ड नोंदला जाणार आहे. ते उद्या (बुधवार) सर्वांधिक काळासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद भुषवणारे नेते बनतील. दिग्गज नेते दिवंगत देवराज उर्स यांच्या नावे आतापर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सर्वांधिक काळ भुषवण्याचा विक्रम होता. त्या विक्रमाशी आज सिद्धरामय्या यांनी बरोबरी केली. उर्स यांनी प्रथम २० मार्च १९७२ ते ३१ डिसेंबर १९७७ या कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर २८ फेब्रुवारी १९७८ ते ७ जानेवारी १९८० असा मुख्यमंत्री म्हणून त्यांना दुसरा कार्यकाळ लाभला. त्यांनी एकूण २ हजार ७९२ दिवस राज्याचे नेतृत्व केले. आता सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून स्वत:च्या दुसऱ्या कार्यकाळात नवा विक्रम रचतील. सिद्धरामय्या १३ मे २०१३ या दिवशी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. उर्स यांच्यानंतर कार्यकाळ पूर्ण करणारे ते कर्नाटकचे दुसरेच मुख्यमंत्री ठरले. सिद्धरामय्या यांनी २० मे २०२३ या दिवशी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारली. ते दुसरा कार्यकाळ पूर्ण करणार का याबाबत उत्सुकता आहे. कर्नाटकमध्ये मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची शक्यता वर्तवणाऱ्या चर्चा सुरू आहेत. त्या राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये सुप्त सत्तासंघर्ष सुरू असल्याचे चित्रही पुढे आले. त्यातून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यात नेतृत्वावरून रस्सीखेच सुरू असल्याचे मानले गेले.