Priyanka Gandhi Vadra : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावादरम्यान लोकसभेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गांधी (Priyanka Gandhi) कुटुंबावर केलेल्या टीकेमुळे राजकारण तापले आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा (Priyanka Gandhi) यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला असून, संसदेत केवळ सरकारचीच मर्जी चालते हे दाखवण्याचा हा प्रयत्न असून हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याची टीका त्यांनी केली. लोकसभेत बोलताना निशिकांत दुबे यांनी बुधवारी गांधी कुटुंबावर निशाणा साधण्यासाठी पुस्तकांचा आधार घेतला. राहुल गांधी एका अप्रकाशित पुस्तकाबद्दल बोलू इच्छितात, मात्र मी गांधी कुटुंबाचा पर्दाफाश करणारी अनेक पुस्तके घेऊन आलो आहे, असे म्हणत त्यांनी काही संदर्भ वाचून दाखवण्यास सुरुवात केली. यावेळी सभागृहाचे कामकाज पाहत असलेले सभापती कृष्णा प्रसाद तेन्नेती यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. Priyanka Gandhi सभापतींनी आधीच अशा प्रकारच्या टिप्पण्यांना परवानगी न देण्याचा निर्णय दिला असल्याचे सांगत दुबे यांना मज्जाव केला. मात्र, यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज ५ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. यानंतर प्रियांका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. निशिकांत दुबे हे सरकारच्या परवानगीशिवाय बोलत नाहीत, असा दावा त्यांनी केला. जेव्हा सरकारला सभागृहाचे कामकाज विस्कळीत करायचे असते, तेव्हाच अशा खासदारांना उभे केले जाते, असा टोला त्यांनी लगावला. त्या म्हणाल्या की, विरोधी पक्षनेत्यांना ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या प्रसिद्ध पुस्तकातील संदर्भ देण्याची परवानगी नाकारली जाते आणि त्याला नियमांचे उल्लंघन ठरवले जाते. मात्र, सत्ताधारी पक्षाचा खासदार पुस्तके वाचून दाखवतो तेव्हा त्यांचा माईक सुरूच राहतो, हा दुजाभाव लोकशाहीसाठी घातक आहे. हे सरकार संसदेच्या नियमांना डावलून केवळ आपली सत्ता गाजवण्याचा सरकारचा हा प्रयत्न असून, हे केवळ सभापतींचेच नव्हे तर संपूर्ण देश आणि जनतेचा अपमान करणारे कृत्य आहे. या घटनेनंतर काँग्रेस खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपला निषेध नोंदवला आहे.