नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करण्याच्या आणि नवीन कायदा आणण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सोमवारी जोरदार आक्षेप घेतला. महात्मा गांधींचे नाव या योजनेतून का काढून टाकले जात आहे आणि त्यामागील सरकारचा हेतू काय आहे असा सवाल त्यांनी केला आहे. संसद संकुलात माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, जेव्हा एखाद्या योजनेचे नाव बदलले जाते तेव्हा त्याचा खर्च येतो. महात्मा गांधींचे नाव का काढून टाकले जात आहे? संसदेत सुरू असलेल्या गतिरोधावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. असे दिसते की सरकार स्वतःच काम करू इच्छित नाही. सरकार स्वतःच संसदेत व्यत्यय आणत आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. विरोधी पक्षांनी प्रदूषणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली होती, परंतु ती चर्चा होत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.