श्रीनगर : कॉंग्रेसने उपस्थित केलेल्या मतचोरीच्या मुद्द्यापासून जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वत:ला स्पष्टपणे दूर ठेवले आहे. या मुद्याशी इंडिया आघाडीचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील ‘वोट चोर गद्दी छोड’ रॅलीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या रॅलीत काँग्रेसने ‘मतचोरी’ हा सत्ताधारी पक्षाच्या डीएनएमध्ये असल्याचा आरोप करत, लोकांचे मतदानाचे हक्क हिरावून घेण्याचा कट रचला जात असल्याचा दावा करण्यात आला होता. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते असलेले ओमर अब्दुल्ला हे विरोधी इंडिया आघाडीचे घटक पक्षप्रमुख आहेत. मात्र कॉंग्रेसच्या रॅलीनंतर दुसऱ्याच दिवशी अब्दुल्ला यांची या मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली. इंडिया आघाडीचा याच्याशी काहीही संबंध नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचा अजेंडा ठरवण्याचा अधिकार आहे. काँग्रेसने मतचोरी आणि एसआयआर हे आपले मुख्य मुद्दे बनवले आहेत. त्याबाबत आम्ही त्यांना वेगळे काही सांगणारे कोण ? असे म्हणताना, त्यांनी आपण या मुद्द्यापासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसने ‘मतचोरी’च्या विरोधात देशभरात मोहीम राबवत सुमारे सहा कोटी स्वाक्षऱ्या गोळा केल्याचा दावा केला असून, त्या राष्ट्रपतींकडे सादर केल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे.