नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राजधानीत भेट घेतली. या बैठकीत केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. अधिकृतपणे या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी, निवडून आलेले सरकार आणि नायब राज्यपाल (एलजी) प्रशासन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवर या भेटीची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये निवडून आलेले सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल्स वरून पेच निर्माण झाला आहे. तसेच, देशाच्या विविध भागांत काश्मिरी शाल विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्त्वाची ठरली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीत सुरू होणार असून, केंद्रशासित प्रदेशांना निधी वाटप करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय हे नोडल मंत्रालय आहे. यापूर्वी अब्दुल्ला यांनी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी, नायब राज्यपालांच्या कार्यालयाशी असलेले संबंध मात्र संघर्षाचे असल्याचे स्पष्ट केले होते. नायब राज्यपालांनी प्रशासकीय नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप करून निवडून आलेल्या सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अब्दुल्ला यांनी केला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शहा आणि अब्दुल्ला यांच्यात भेट झाल्याचे समजते.