पाटणा : बिहारमध्ये महिलांवरील गुन्ह्यांत वाढ झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय जनता दलाने (राजद) बुधवारी पाटणा येथे जोरदार निषेध मोर्चा काढला. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि गृहखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.पाटण्यात अलीकडेच दोन विद्यार्थिनी त्यांच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळल्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये १८ वर्षीय नीट परीक्षार्थी विद्यार्थिनी आणि एक शाळकरी मुलगी यांचा समावेश आहे. पोस्टर आणि बांगड्या हातात घेऊन राजद महिला शाखेच्या कार्यकर्त्यांनी वीरचंद पटेल रोडवरील पक्ष कार्यालयापासून आयकर क्रॉसिंगपर्यंत मोर्चा काढत घोषणाबाजी केली. राजद महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अनिता भारती यांनी आरोप केला की, एनडीए सरकारच्या काळात बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. राज्याच्या राजधानीतही मुली सुरक्षित नाहीत, हे धक्कादायक आहे. असंवेदनशील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे त्या म्हणाल्या. जहानाबादची रहिवासी असलेली १८ वर्षीय नीट परीक्षार्थी वसतिगृहात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर उपचारादरम्यान ११ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानुसार लैंगिक अत्याचाराची शक्यता नाकारता येत नाही. औरंगाबादची आणखी एक किशोरीही ११ जानेवारी रोजी पाटण्यात मृतावस्थेत आढळली. दरम्यान, बिहार राज्य महिला आयोगाने पाटण्यात मुलींच्या वसतिगृहांच्या नोंदणी व नियमांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असून नियमांचे पालन होते का याची चौकशी सुरू असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी सांगितले.