कोलकता : सक्तीवसुली संचालनालयाने (ईडी) केवळ राजकीय सूडाच्या पोटी तृणमूल काँग्रेस आयटी प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला आहे. सर्व तपास यंत्रणा केंद्राच्या हातात असल्याने विरोधकांना या देशात जगणेही मुश्कील झाले आहे. मात्र आगामी निवडणुकीत मतदार अशा पक्षाच्या नेत्यांना नक्कीच घरी बसवतील, असे प्रतिपादन तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा आण्इ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ईडीने गुरुवारी यांनी प्रतीक जैन यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर बॅनर्जी या जैन यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. गुरुवारी, ईडीने देशभरातील ६ राज्यांमध्ये १५ ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी च्या कोलकाता कार्यालयाचा समावेश होता. सरकारी नोकऱ्यांच्या खोट्या दाव्यांसह झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने हे छापे टाकले. असा एक गट बनावट नोकऱ्या देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे. बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, तृणमूलच्या आयटी प्रमुखांच्या घरावरछापा टाकणे हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे काम आहे का? हे गृहमंत्र्यांचे सर्वात घृणास्पद कृत्य आहे. यावेळी ईडीने हार्ड ड्राइव्ह, अंतर्गत कागदपत्रे आणि संवेदनशील संघटनात्मक डेटा जप्त करण्याचा प्रयत्न केला. ईडी ही सर्व कागदपत्रे जप्त करत आहे आणि ती भाजपला देणार आहे. तपासात थेट हस्तक्षेप अनैतिक पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी छाप्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आगमन असंवैधानिक आणि केंद्रीय एजन्सीच्या तपासात हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी. मुख्यमंत्री आणि कोलकाता पोलिस आयुक्तांची भेट अनैतिक, असंवैधानिक आणि केंद्रीय एजन्सीच्या तपासात थेट हस्तक्षेप असल्याचे माझे मत आहे, असे त्यांनी सांगितले.