चेन्नई : तमिळनाडूतील द्रमुक आणि कॉंग्रेस या सत्ताधारी मित्रपक्षांत विधानसभा निवडणुकीआधी फाटाफूट अटळ आहे. सत्ताधारी आघाडीतून कॉंग्रेस बाहेर पडेल, असा दावा अण्णाद्रमुकचे प्रमुख के.पलानीस्वामी यांनी गुरूवारी केला. तमिळनाडूतील द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकार अकार्यक्षम ठरले. त्यामुळे सरकारच्या विरोधात जनतेच्या मनातील असंतोष वाढत आहे. त्याची जाणीव झाल्याने कॉंग्रेस सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याची संधी शोधत आहे. जागावाटप, सत्तेतील भागीदारी या मुद्द्यांवरून त्या मित्रपक्षांत मतभेद वाढीस लागल्याची माहिती मिळत आहे, असे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. तमिळनाडूची सत्ता आघाडीने राखल्यास सरकारमध्ये स्थान मिळावे, असा प्रस्ताव कॉंग्रेसकडून देण्यात आला. मात्र, द्रमुकने तो अमान्य केला. त्याविषयीच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या. त्याशिवाय, राजकारणात एन्ट्री घेणारे तमिळ अभिनेते विजय यांच्या पाठीशी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी उभे राहिल्याची घडामोड घडली. विजय यांच्या जन नायगन (जननायक) या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे. त्यावरून तमिळनाडूत राजकीय गदारोळ सुरू आहे. अशात विजय यांच्या समर्थनार्थ राहुल पुढे सरसावल्याचे दिसून आले. त्यामुळे कॉंग्रेस आणि विजय यांचा तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्ष एकत्र येऊ शकतो, असा अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, पलानीस्वामी यांनी राजकीय चर्चांना आणखी खतपाणी घालणारा दावा केला. तमिळनाडूत मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.