Gaurav Gogoi : आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांच्यावर केलेल्या ‘पाकिस्तानी कनेक्शन’च्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री सर्मा यांनी केलेले सर्व आरोप अत्यंत बिनबुडाचे आणि हास्यास्पद असल्याचे सांगत गोगोई (Gaurav Gogoi) यांनी या प्रकरणाचा कडाडून निषेध केला. सर्मा यांची पत्रकार परिषद म्हणजे ‘सी-ग्रेड सिनेमा’पेक्षाही सुमार दर्जाचा प्रकार असल्याची खोचक टीका गोगोई यांनी केली आहे. मुख्यमंत्री सर्मा यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला होता की, गौरव गोगोई, त्यांच्या पत्नी एलिझाबेथ आणि अली तौकीर शेख नावाच्या एका पाकिस्तानी नागरिकाचे जवळचे संबंध आहेत. इतकेच नव्हे तर गोगोई यांनी २०१३ मध्ये पाकिस्तानचा अत्यंत गोपनीय दौरा केला असून तिथे त्यांनी कसले तरी प्रशिक्षण घेतल्याचा संशयही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गुप्तचर विभागाची माहिती शेजारील राष्ट्राला पुरवली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना गौरव गोगोई यांनी समाजमाध्यमावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. Gaurav Gogoi ते म्हणाले की, स्वतःला राजकीयदृष्ट्या चतुर समजणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे अत्यंत बुद्धिशून्य आहेत. ही पत्रकार परिषद म्हणजे या शतकातील सर्वात मोठा ‘सुपर फ्लॉप’ शो होता. अशा निष्फळ चर्चेसाठी दिल्ली आणि आसाममधील पत्रकारांना वेळ वाया घालवावा लागला, याचे मला वाईट वाटते. गोगोई यांनी पुढे असा दावा केला की, काँग्रेसच्या समय परिवर्तन यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री अस्वस्थ झाले आहेत. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने बळकावलेल्या १२ हजार बिघा जमिनीचे वास्तव जनतेसमोर येत असल्यानेच लक्ष भरकटवण्यासाठी असे खोटे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हणटले.