नवी दिल्ली : ज्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत किंवा बहुमतात नाही, तेथे ते इतर राजकीय पक्षांशी युती करून सत्तेवर येता. त्यानंतर मित्रपक्षांना कमकुवत करत त्यांना सत्तेतून हटविणे, ही भाजपची राजकीय रणनीती आहे. ही रणनीती बिहारमध्ये यशस्वी झाली आणि आता महाराष्ट्रात राबवली जात आहे, असे म्हणत ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी भाजपच्या रणतीनीवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालानंतर कपिल सिब्बल यांनी एक्स पोस्ट करत भाजपच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच ही निवडणूक विरोधी पक्ष आणि लहान पक्षांसाठी संदेश असल्याचे त्यांनी म्हटले. कपिल सिब्बल म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, त्याचे निकाल आपल्यासमोर आले आहेत. ही निवडणूक महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकीबाबत काही संकेत देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेचे वार्षिक बजेट हे सुमारे ७४ हजार कोटींचे आहे. म्हणजे सिक्कीम, गोवा आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षाही मोठे यांचे बजेट आहे. त्यामुळे याचे एक वेगळे महत्त्व आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या इतिहासाबद्दल बोलताना सिब्बल यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांच्या जागा कमी होत गेल्याचा मुद्दा अधोरेखित केला. सिब्बल म्हणाले, मागील निवडणुकीत शिवसेना एकत्र लढली होती, म्हणजेच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र होते, तेव्हा त्यांनी बहुमत मिळवले होते. सध्या शिंदे गटाने महापालिका गमावली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.