बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यावर कॉंग्रेसने आगामी आसाम विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे कर्नाटकात पुढील काही महिने तरी मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातून बढतीची आकांक्षा बाळगणाऱ्या शिवकुमार यांना वेटिंगवर रहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमध्ये काही काळापासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. चालू महिन्यात नेतृत्वबदल होईल, असा ठाम दावा कॉंग्रेसच्याच एका आमदाराने याआधी वारंवार केला. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली. अशात कॉंग्रेसने आसामसाठीच्या वरिष्ठ पक्ष निरीक्षकांची नावे जाहीर केली. त्यामध्ये शिवकुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीमुळे भुवया उंचावल्या गेल्या. आसाममध्ये मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. साहजिकच, ती निवडणूक होईपर्यंत तरी कॉंग्रेस श्रेष्ठी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदल करण्याच्या मुडमध्ये नसल्याचे सूचित झाले. दरम्यान, पत्रकारांनी शिवकुमार यांना आसामसाठीच्या जबाबदारी विषयीचा प्रश्न विचारला. माझ्याकडे कुठला पर्याय नाही. पक्षाने सोपवलेली जबाबदारी आम्हाला सांभाळावी लागते. काही वर्षांपूर्वी मी आसाममध्ये कार्य केले. आताही ते करेन, असे उत्तर त्यांनी दिले.