बेंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी बुधवारी भाजपकडून उत्पादन शुल्क मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याची करण्यात आलेली मागणी ठामपणे फेटाळून लावली. भाजप कोणतेही ठोस पुरावे न देता आरोप करत असून, हे केवळ मुद्दे वळवण्यासाठीचे राजकीय नाटक असल्याचे शिवकुमार यांनी स्पष्ट केले. विधानसभेत भाजपने केलेल्या रात्रभर आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार (D. K. Shivakumar) म्हणाले की, सरकारने मनरेगा ऐवजी विकसित भारत हमी योजना (ग्रामीण) या विषयावर सुरू केलेल्या चर्चेला रोखण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले. त्यांना मनरेगावर चर्चा नको आहे. म्हणूनच बनावट मुद्दे उभे करून सभागृहाचे कामकाज अडवले जात आहे. dk shivkumar कोणतेही पुरावे नसताना राजीनाम्याची मागणी करणे हास्यास्पद आहे, असे ते म्हणाले. शिवकुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, काँग्रेस सरकार पारदर्शक कारभारासाठी वचनबद्ध असून, पुराव्यांवर आधारित कारवाईस सदैव तयार आहे. मात्र राजकीय दबावाखाली किंवा निराधार आरोपांवर मंत्रीमंडळातील बदल होणार नाहीत. आरोप सिद्ध झाल्यास पद सोडण्यास तयार… गृहमंत्री जी. परमेश्वर यांनीही सरकारची भूमिका ठाम असल्याचे सांगत भाजपकडे जर भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर ते सादर करावेत. आरोप सिद्ध झाले तर मंत्री स्वतः पद सोडण्यास तयार आहेत, असे स्पष्ट केले. केवळ आरोपांवरून कारवाई करता येत नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. भाजपकडून उत्पादन शुल्क विभागात मोठ्या घोटाळ्याचे आरोप करण्यात येत असले तरी, ते लोकायुक्तांच्या चौकशीखाली असलेल्या अधिकाऱ्यांपुरते मर्यादित आहेत आणि त्याचा थेट संबंध मंत्र्यांशी जोडण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सादर झालेले नाहीत, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.