Congress : पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress) नेते प्रताप सिंग बाजवा यांनी पंजाबचे कॅबिनेट मंत्री हरभजन सिंग यांच्याबद्दल केलेल्याआक्षेपार्ह वक्तव्याचा आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा, वनमंत्री लालचंद कटारुचक आणि आपचे पंजाब मीडिया प्रभारी बलतेज पन्नू यांनी संयुक्तपणे या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. काँग्रेस पक्षाला दलितविरोधी पक्ष म्हणत, तिन्ही नेत्यांनी बाजवा आणि काँग्रेस पक्षाला २४ तासांच्या आत माफी मागावी अन्यथा कठोर कायदेशीर आणि राजकीय कारवाईला सामोरे जावे असा कडक इशारा दिला. बाजवा यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत हरपालसिंग चीमा म्हणाले की, कॅबिनेट मंत्री हरभजन सिंग हे अत्यंत गरिबीतून वर आले आहेत. त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि पंजाब अलाइड सर्व्हिसेसमध्ये ईटीओ झाले. त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि सामाजिक सेवेच्या भावनेतून आम आदमी पक्षात सामील झाले. आम आदमी पक्षाने त्यांचा सन्मान केला आणि त्यांना मंत्री केले. परंतु आज प्रताप सिंग बाजवा यांनी त्यांच्याविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषा वापरली आहे, जी संपूर्ण दलित समुदायाचा अपमान आहे. चीमा यांनी स्पष्टपणे सांगितले की काँग्रेस पक्ष हा दलितविरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाकडून सर्व दलित मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. कधी ते वेगवेगळ्या सबबी सांगतात, कधी नाव घेऊन, तर कधी त्यांना मटेरियल म्हणून हिणवतात. आता तर त्यांनी हरभजन यांना बजानेवाले (वाजवणारे) असे म्हणून आक्षेपार्ह टीका केली आहे. दलितांविरुद्ध अशी भाषा वापरणे अत्यंत लज्जास्पद आहे. जातीचे नाव घेऊन आक्षेपार्ह भाष्य करणे त्यांना शोभत नाही. चीमा यांनी प्रताप सिंग बाजवा आणि संपूर्ण काँग्रेस पक्षाने २४ तासांच्या आत दलित समुदायाची माफी मागावी अन्यथा कठोर कारवाई करावी अशी कडक मागणी केली. हा पंजाबमधील दलित समुदायाचा घोर अपमान आहे. अशाप्रकारे पंजाबमधील कष्टकरी विद्यार्थ्यांना पुढे येण्यापासून परावृत्त करणे हे निराशाजनक आहे असे ते म्हणाले.