चंदीगड : शीख धर्मियांची सर्वोच्च संस्था असलेल्या अकाल तख्त साहिबने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना समन्स बजावले आहे. त्यांना १५ जानेवारी रोजी अकाल तख्त सचिवालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यावरून आपण एक नम्र शीख म्हणून अकाल तख्त येथे अनवाणी उपस्थित राहणार असल्याचे मान यांनी म्हटले आहे. अकाल तख्त साहिबने मुख्यमंत्र्यांना शीख शिष्टाचार, शीख श्रद्धा आणि सर्वोच्च शीख संस्थांविरुद्ध वारंवार केलेल्या विधानांचे स्पष्टीकरण देण्यासाठी समन्स बजावले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान हे अकाल तख्तसमोर पाचारण करण्यात आलेले चौथे विद्यमान मुख्यमंत्री असतील. यापूर्वी, दिवंगत भीम सेन सच्चर, सुरजित सिंग बर्नाला आणि प्रकाश सिंग बादल यांनाही अकाल तख्तवर बोलावण्यात आले आहे. १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान राष्ट्रपती असताना ग्यानी झैल सिंग यांनाही पंथविरोधी कारवायांसाठी जबाबदार धरण्यात आले होते. त्यावेळी जरी ते अकाल तख्तसमोर हजर झाले नाहीत, परंतु नंतर ते तिथे हजर झाले होते आणि त्यांनी माफी मागितली होती व सेवा देऊ केली.