राजकोट : तुरुंगात असलेले लोक दहशतवादी नाहीत, ते शेतकरी आहेत. आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांना भेटण्यासही परवानगी दिली जात नाही, यापेक्षा मोठा अन्याय काय असू शकतो ? असा सवाल उपस्थित करताना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरात सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी, स्वातंत्र्यसैनिकांना भगतसिंग यांच्या सहकाऱ्यांनाही भेटण्यापासून रोखले गेले नव्हते, याची आठवण करून देत सरकारवर टीकास्त्र सोडले. ऑक्टोबर महिन्यात बोटाड जिल्ह्यातील हद्दाद गावात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी शेतकरी आणि आप नेत्यांना अटक केली होती. त्यापैकी काही जण अजूनही तुरुंगात आहेत. या संदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले की, आम्ही पूर्वपरवानगी घेवून राजकोट तुरुंगात शेतकऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतू आम्हाला प्रशासनाने परवानगी दिली नाही. अशा प्रकारची वागणूक देणारे सरकार ब्रिटिशांपेक्षाही अधिक क्रूर व अत्याचारी असल्याचा आरोप त्यांनी केला. अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गुजरात सरकारवर शेतकऱ्यांच्या अटकेवरुन जोरदार टीका केली. अटक केल्यानंतर शेतकऱ्यांना २४ तास अन्न व पाणी दिले गेले नाही तसेच कोठडीत मारहाण करण्यात आली. भाजप सरकार शेतकऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. रावण आणि कंससुद्धा अहंकारामुळे नष्ट झाले, असा ऐतिहासिक दाखला देताना, या शेतकऱ्यांच्या सुटकेची मागणी त्यांनी केली. भाजप व कॉंग्रेसला सक्षम पर्याय आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील आमली पदार्थाच्या प्रश्नावरुन देखील सरकारला धारेवर धरले. ड्रग्समुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत असताना, सरकार मात्र तरुणांचे प्रश्न दडपण्यासाठी दडपशाही करत आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केली. तसेच सत्तेतील भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांपेक्षा आम आदमी पक्ष हाच गुजरात वाचावण्यासाठी सक्षम पक्ष असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.