लखनौ : निवडणुकांमध्ये सध्या महिलांसाठीच्या आर्थिक योजनांचा मोठा बोलबाला आहे. अशात समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भिस्त लाडक्या बहिणींवर राहणार असल्याचे सूचित झाले. मागील काही वर्षांत विविध राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये महिलांना रोख रक्कम उपलब्ध करणाऱ्या योजना निर्णायक ठरल्याचे दिसून आले. आता पुढील काळात आणखी काही राज्यांच्या निवडणुका होतील. सप प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या उत्तरप्रदेशात २०२७ यावर्षी निवडणूक होईल. त्या आगामी राजकीय रणसंग्रामाचा संदर्भ अखिलेश यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिला. त्यांनी निवडणुकीला सामोरे जाताना सपही महिलांसाठीची योजना आणणार असल्याचे सूचित केले. उत्तरप्रदेशात सपचे सरकार असताना समाजवादी पेन्शन योजना लागू होती. त्याअंतर्गत महिलांना दरमहा ५०० रूपयांची आर्थिक मदत दिली जात होती. आता उत्तरप्रदेशात पुन्हा सपचे सरकार स्थापन झाल्यास गरीब महिलांना दरवर्षी प्रत्येकी ४० हजार रूपये उपलब्ध केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता आहे. आता सपला राजकीय शह देण्यासाठी भाजप एखादी योजना पुढे करणार का, याविषयी उत्सुकता आहे.