कूचबिहार : पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रक्रिया सुरु असून त्यानूसार निवडणूक आयोगाने मसूदा मतदार यादी देखील जाहीर केली आहे. यामधून 54 लाख नावे विविध कारणांसाठी वगळण्यात आली आहेत. त्यावरुन सध्या बंगालमध्ये धुमशान सुरु आहे. मसूदा यादीतून मृत म्हणून वगळण्यात आलेल्या १० मतदारांना टीएमसीने आपल्याच रॅलीमध्ये बोलवताना, निवडणूक आयोगाने या नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला असल्याचा आरोप केला. या रॅलीचे आयोजन टीएमसीच्या वतीने अभिषेक बॅनर्जी यांनी केले होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. आज रॅलीमध्ये उपस्थित करण्यात आलेले हे सर्व नागरिक कूचबिहारचे रहिवासी आहेत. भाजपचा हस्तक असलेल्या निवडणूक आयोगाने त्यांना मृत घोषीत करताना, त्यांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतला असल्याचा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला. याबरोबरीने कूचबिहार जिल्ह्यातून सूमारे साडे तीन लाख लोकांना कथित तार्किक विसंगती बाबात नोटीसा पाठवण्यात आल्या असल्याचा दावा देखील अभिषेक यांच्याकडून करण्यात आला आहे. एस आय आर प्रक्रियेमुळे राज्यात 78 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा देखील टीएमसीकडून करण्यात आला. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणूकीत कूचबिहार जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागांवर टीएमसी उमेदवार उभे करणार असून, त्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन देखील अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी केले.