मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त मुलाखतीत सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: भाजपवर घणाघाती टीकास्त्र सोडले. राज्यकर्त्यांचे प्रेम राज्यावर हवे; सत्तेवर नव्हे. राज्यात राज्यकर्ते मराठी असतील; पण त्यांचे मालक दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करत आहेत. आम्ही हे कारस्थान उधळून लावू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्र राज्य म्हणजे क्लीन चिट देणारी फॅक्टरी बनली आहे, असा आरोपही त्यांनी केला. ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरेबंधूंची एकत्रित मुलाखत घेतली. त्यावेळी ठाकरेबंधूंनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरे देत केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार शाब्दिक तोफ डागली. संबंधित मुलाखतीचा पूर्वार्ध गुरूवारी ठाकरेसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकात प्रसिद्ध झाला. राज्यकर्ते फक्त ठेकेदारांसाठीच काम करत आहेत. राज्य संपले तरी चालेल; पण ठेकेदारांसाठी सत्ता राबवली जातेय, अशी टीका उद्धव यांनी केली. राजकारणात युत्या अन् आघाड्या होतात. त्या प्रसंगी तुटतात. पुन्हा पक्ष एकत्र येऊ शकतात. पण, पक्ष संपवणं हा कुठला प्रयोग? महाराष्ट्र दुबळा करण्यासाठीच शिवसेना तोडण्यास आली, असा दावाही त्यांनी केला. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करणं हे काहींचं जुनं स्वप्न आहे. ते कसं पूर्ण करता येईल यासाठी खटाटोप सुरू आहे. मुंबई वेगळी करण्याची इच्छा असणारे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहेत. महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेवर आले तर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई विचारात घेऊन आम्ही एकत्र आलो. मराठी माणसानेही एक व्हायला हवे, असे आवाहनही ठाकरेबंधूंनी केले.