मुंबई : बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला कोलकाता नाइट रायडर्सच्या 2026 च्या आयपीएल संघातून वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केल्याबद्दल ठाकरेसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा केला आहे. दुबे यांना त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचे संदेश आणि अज्ञात व्यक्तींकडून फोनही आले असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करून दुबे यांनी दावा केला की, बीसीसीआयच्या निर्णयाला चांगला निर्णय म्हटल्याबद्दल त्यांचा अपमान करण्यात आला आणि त्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. हा मुद्दा (धमक्या आणि शिवीगाळ) गंभीर आहे. पोलिस राज्य सरकारने याची दखल घेतली पाहिजे. दोन्ही शेजारील देशांमधील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सूचना दिल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने रहमानला संघातून वगळले आहे. त्याला आयपीएल लिलावात ९.२ कोटी रुपये बोली मिळाली होती. २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आवश्यक असल्यास केकेआरला बदली खेळाडू निवडण्याची परवानगी दिली जाईल.