Ekta Sawant : डोंबिवलीत शॉरमा विक्री करणाऱ्या एका मराठी तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणाची दखल थेट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेत ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना विषय सोडवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अविनाश जाधव यांनी संबंधित तरुणीची भेट घेत तिची बाजू ऐकून घेतली तसेच तिच्या व्यवसायाला पाठबळ देण्याची भूमिका घेतली. नेमकं प्रकरण काय? डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला प्रश्न आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित तरुणी शॉरमा विक्रीचा व्यवसाय करत असून, केडीएमसीकडून केवळ तिच्याच स्टॉलवर वारंवार कारवाई केली जात असल्याचा आरोप तिने केला आहे. इतर हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांवर मात्र पालिका अधिकारी मेहरबान असल्याचा दावा तरुणीने केला आहे. या अन्यायाविरोधात तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली होती. या पोस्टची दखल घेत राज ठाकरे ( Raj Thackeray )यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल झाले. मनसे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचताच अनेक फेरीवाल्यांची पळापळ झाल्याचेही चित्र दिसून आले. RAJ Thackery मनसेने स्पष्टपणे मराठी व्यवसाय करणाऱ्या तरुणीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. “परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई टाळून मराठी तरुणीवर अन्याय केला जात असेल, तर तो खपवून घेतला जाणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोण आहे एकता सावंत? दरम्यान, एकता सावंत (Ekta Sawant) असे या तरुणीचे नाव असून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध रीलस्टार आहे. इंस्टाग्रामवर तिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असून तिचे व्हिडिओ लाखोंच्या संख्येने पाहिले जातात. “माझ्याकडून रोज ३०० रुपये हप्ता घेतला जात असतानाही माझ्याच स्टॉलवर कारवाई करण्यात आली,” असा गंभीर आरोप एकताने केला आहे. या आरोपांनंतर अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एकता सावंत हिच्याशी संवाद साधत, तिच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना असल्याचा विश्वास व्यक्त केला. “कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी दुजाभाव करत असतील, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” असा इशाराही आमदार मोरे यांनी दिला आहे. पोलिसांनी केला लाठीचार्ज दरम्यान, डोंबिवली स्टेशन परिसरात ती पत्रकारांशी संवाद साधत असताना मोठ्या प्रमाणात जमाव जमला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला असून, या घटनेत पत्रकारांशीही वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी तरुणी केवळ प्रसिद्धीसाठी हे करत असल्याचे म्हणत पत्रकारांशी शाब्दिक वाद घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.