मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Uddhav Thackeray) प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आज ११ जानेवारी २०२६ रोजी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीची ऐतिहासिक संयुक्त सभा पार पडली. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. हजारोंच्या जनसागरासमोर उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर, आर्थिक लुटमारवर आणि राजकीय द्वैतावर तीव्र टीका केली. भाजपच्या हिंदुत्वावर तीव्र टीका उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे. काश्मीरमध्ये माता-भगिनींचा सिंदूर पुसला गेला, त्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करून ऑपरेशन सिंदूर केलं. आणि काही दिवसांतच याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला शहांचे चिरंजीव पुढे! हे काय देशप्रेम आहे?” ते पुढे म्हणाले, “काँग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असं तुम्ही म्हणता. मग फडणवीस अंबरनाथमध्ये काय सोडलं? ईदच्या दिवशी मोदींना लहानपणी मुस्लिम कुटुंबाकडून जेवण यायचं, सौगात ए मोदी केली तरी चालतं. आम्ही साधं अमर शेखचं नाव घेतलं तर आम्ही हिंदुत्व सोडलो? तुम्ही जे करताय ते काय अमरप्रेम आहे का?” मुंबईची लूट आणि आर्थिक आरोप उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवरही जोरदार टीका केली. “भाजपला एका वर्षात ३१०० कोटी रुपये निधी मिळाला. राज्य आणि केंद्र सरकार त्यांचं आहे. महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास १० हजार ९०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरत आहेत आणि मुंबई लुटली जात आहे. तिकडे गणेश नाईक बोंब मारतायत की नवी मुंबई महापालिका कर्जबारी झाली आहे!” अजित पवार प्रकरणावर घणाघात ७० हजार कोटींचे आरोप तुम्ही आणि मोदींनी केले, ढिगभर पुरावे दिले. केस चालू आहेत म्हणताय, पुरावे तुम्ही दिले ते पुरावे की जाळावे कोर्टाने सांगावं. तुम्हाला माहीत आहे पुरावे दिले, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. नसेल तर अजित पवारांची माफी मागा, हेच तुमचे चाळे चालू आहेत. लोकांना बदनाम करायचे, आयुष्यातून उठवायचे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. फडणवीसांना खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले. “मी फडणवीस यांना आव्हान देतो. आजच या व्यासपीठावर या चर्चा करा. आदित्यला सांगतो तुम्ही मुद्द्याचं बोला. या लोकांना महापालिका शिवसेनेने दाखवली. या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप मी केलं, हे अभिमानाने नाही तर शरमेने सांगावं लागतं.” या सभेत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना शिंदे गटलाही लक्ष्य केलं. राज ठाकरे यांनीही भावनिक भाषण करून युतीचा निर्धार व्यक्त केला होता. ही संयुक्त सभा मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला मोठे आव्हान देत असून, १५ जानेवारीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण अधिक तापले आहे.